Good News: राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित
राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर (पेड इन जानेवारी) वेतनासाठी अनुदान वितरणाबाबत GR निर्गमित
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2025 चे वेतन (पेड इन जानेवारी 2026) अदा करण्यासाठी आवश्यक अनुदान वितरणाबाबत दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे.
सदर शासन निर्णयानुसार, वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (BEAMS) प्राप्त झालेला अनुदानाचा निधी संबंधित निधी नियंत्रक अधिकाऱ्यांना वितरित करण्याबाबत शासन स्तरावर विचारविनिमय करण्यात आला होता. या विचाराअंती सदर निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार, सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी खाली नमूद केल्याप्रमाणे विविध नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, नगरपालिका मंडळे तसेच जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शाळांची तपासणी, प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य, प्राथमिक शाळा तपासणीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमांतर्गत सप्रयोजन अनुदाने तसेच सर्वसाधारण शिक्षणाशी संबंधित लेखाशिर्षांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तसेच, अशासकीय माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, पर्वाध्ययन सैनिकी शाळांना सहायक अनुदाने, क्रीडा युवक कल्याण सेना, क्रीडा व खेळ, सुरक्षा व कल्याण, समाजकल्याण, वृद्ध, विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण, सचिवालय सामाजिक सेवा (090 सचिवालय) तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित इतर लेखाशिर्षांखालील निधीचे वितरण करण्यासही या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.
सदर निधीचे लेखाशिर्षनिहाय वितरण करण्याबाबत सविस्तर तरतूद शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली असून, संबंधित सर्व कार्यालये व आहरण व संवितरण अधिकारी यांनी या निर्णयानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
लेखाशिर्षनिहाय निधीचे संपूर्ण व सविस्तर वितरण पाहण्यासाठी संबंधित शासन निर्णय (GR) डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.