१० वर्षे सेवा केलेले राज्यातील ‘हे’ कर्मचारी होणार कायम; शासन निर्णय GR निर्गमित

१० वर्षे सेवा केलेले राज्यातील ‘हे’ कर्मचारी होणार कायम

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ४ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ डिसेंबर रोजी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच विविध आरोग्य योजनांमध्ये हे कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवा देत होते.

कंत्राटी सेवेमुळे अनेक अडचणी

आतापर्यंत कंत्राटी पद्धतीमुळे या कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती नव्हती. त्यांना निवृत्तिवेतन, पदोन्नती, वैद्यकीय सुविधा आणि इतर शासकीय लाभ मिळत नव्हते. अनेक वेळा मानधनही वेळेवर मिळत नव्हते. या समस्यांमुळे कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने करून शासनाकडे मागण्या मांडल्या होत्या.

आंदोलनानंतर शासनाचा सकारात्मक निर्णय

कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनांची दखल घेत आणि विविध संघटनांच्या मागण्यांचा विचार करून अखेर शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नोकरीला सुरक्षितता मिळणार आहे.

पुढील टप्प्यात वेतन निश्चिती

यापूर्वी ४ डिसेंबर २०२४ रोजी सलग १० वर्षे सेवा केलेल्या वाहन चालकांना नियमित सेवेत सामावून घेण्याचा आदेश देण्यात आला होता. आता त्या आदेशात सुधारणा करून वेतन निश्चितीबाबत नवा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन नियमानुसार, सेवेत समाविष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे त्यांच्या आतापर्यंत मिळणाऱ्या मानधनाइतके किंवा त्यापेक्षा जास्त, नियमित वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित केले जाईल. याचा फायदा सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.

Leave a Comment